आग्रा जिल्हा न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था~ आग्रा
इटावा येथील भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना आग्रा जिल्हा न्यायाधीश न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार-आमदार न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच खासदार-आमदार न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेचा निकाल दिला. या निर्णयाविरोधात कठेरिया यांनी सोमवार, 7 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायाधीश न्यायालयात अपील केल्यानंतर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. या निर्णयाचे भाजप खासदार कठेरिया यांच्या समर्थकांनी त्यांच्या आग्रा येथील निवासस्थानी मिठाई वाटून स्वागत केले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
उत्तरप्रदेशच्या इटावाचे भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना एमपी-एमएलए न्यायालयाने कठेरिया यांना कलम 147 आणि 323 अंतर्गत दोषी ठरविले होते. भाजप खासदारावर साकेत मॉलमधील टोरंट कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप होता. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावतानाच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. या शिक्षेमुळे कठेरिया यांना संसद सदस्यत्व गमवावे लागण्याची शक्यता होती. मात्र, आता शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे खासदारपद कायम राहणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्याला तत्काळ अपात्र ठरवण्यात येते.









