सर्वोच्च न्यायालयाकडून जैसे थे स्थिती राखण्याचा आदेश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृष्ण जन्मस्थानानजीक नई बस्तीमध्ये रेल्वेच्या भूमीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीनजीकच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला 10 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. रेल्वेला नोटीस जारी करत न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी एक आठवड्यानंतर होणार असल्याचे म्हटले आहे. न्यायाधीश अनिरुद्ध बोस, संजय कुमार आणि एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस जारी केली आहे.
100 घरांवर बुलडोझर चालविण्यात आला असून आता केवळ 70-80 घरे शिल्लक राहिली आहेत. बुलडोझरची कारवाई प्रशासनाने उत्तरप्रदेशातील न्यायालयांचे कामकाज बंद असलेल्या दिवशी केल्याचा युक्तिवाद याचिकाकर्ते याकूब शाह यांच्या वकिलाकडून करण्यात आला.
भारतीय रेल्वे स्वत:च्या रेल्वेमार्गानजीक वसलेल्या लोकांच्या विरोधात अतिक्रमण हटाओची कारवाई करत आहे. 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या परिसरात लोक राहत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
सोमवारी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीनजीक रेल्वेमार्गावर अतिक्रमण करणाऱ्या घरांवर जेसीबी चालविण्यात आला होता. यादरम्यान 75 घरांना पाडण्यात आले होते. तर 135 पैकी 60 घरांना 9 ऑगस्ट रोजी पाडण्यात आले होते.









