मनपा आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा : सर्व कामे त्वरित करण्याची सूचना
बेळगाव : जनतेची कामे करणे हे आपले कर्तव्य आहे. जनतेची कामे करताना त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणे योग्य नाही. जर जनतेने काम केले नाही म्हणून तक्रार केली तर संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये जमा करण्यात आलेल्या कराबाबत तसेच कर जमा करण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करा, अशी सूचनादेखील त्यांनी केली आहे. कर जमा झाला तर शहरातील विकासकामे करणे शक्य होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित असलेला कर जमा करण्याकडे अधिक भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काही अधिकारी जाणूनबुजून कामे प्रलंबित ठेवत आहेत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित कामे तातडीने निकालात काढा, अशी सक्त ताकीद दुडगुंटी यांनी दिली आहे. शहरातील जनता विविध समस्यांनी त्रासली असताना त्यांना हेलपाटे लावणे योग्य नाही. वृद्ध तसेच महिलादेखील कामानिमित्त कार्यालयाकडे येत असतात. मात्र काही तरी कारण देऊन त्यांना उद्या या, अशी उत्तरे दिली जातात, हे योग्य नाही. आम्हाला जनतेची कामे करण्यासाठीच सरकारने नियुक्त केले आहे. त्यामुळे जनतेची कामे करण्याकडे अधिक प्राधान्य द्या, प्रलंबित असलेल्या फायली तातडीने निकालात काढा, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीमध्ये महसूल, आरोग्य व इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते.