पक्षविरोधी वक्तव्यांमुळे के. चंद्रशेखर राव यांचा कडक पवित्रा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) विधान परिषदेतील आमदार के. कविता यांना मंगळवारी तात्काळ प्रभावाने पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षाच्या धोरणांविरुद्ध केलेल्या विधानांमुळे आणि पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्याविरोधात पक्षाने कडक पवित्रा घेतला आहे.
कविता यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय त्यांचे वडील आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. कविता यांची अलिकडील विधाने आणि त्यांच्या कारवाया पक्षाच्या धोरणांविरुद्ध आणि तत्त्वांविरुद्ध असल्याचे राव यांनी सांगितले. के. चंद्रशेखर राव यांनी स्वत: कविता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करताना निलंबनाची घोषणा केली. गेल्या आठवडाभरातील वाढत्या राजकीय तणावानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. निलंबनाच्या एक दिवस आधी, के. कविता यांनी पक्षातील सहकाऱ्यांवर केसीआर यांची प्रतिमा खराब करण्याचा उघड आरोप करून बीआरएसमध्ये वादळ निर्माण केले होते.
कविता यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते टी. हरीश राव आणि माजी खासदार मेघा कृष्णा रेड्डी यांच्यावर त्यांच्या वडिलांना भ्रष्ट ठरवल्याचा आरोप केला होता. कविता यांनी हरीश राव आणि संतोष कुमार यांनी त्यांना बाजूला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.









