पॉलिटीकल गॉडफादरकडे फिल्डिंग : किमान तीन मंत्रिपदाची आस
कोल्हापूर :
कोल्हापुरातील विधानसभेच्या दहा पैकी थेट नऊ जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या. चंदगडची एक जागाही महायुतीची मानली जाते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मंत्री कोण–कोण होणार याची चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यापैकी कोण मंत्री होणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुकांनी पॉलिटीकल गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रथमच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर हे तीन उमेदवार निवडून आले. तर महायुतीने पाठिंबा दिलेले अपक्ष राजेंद्र पाटील–यड्रावकर आणि महायुतीला पाठिंबा दिलेले आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने यांनी बाजी मारली. तर चंदगडमधून अपक्ष निवडून आलेले शिवाजी पाटील हे भाजप समर्थक मानले जातात. विधानसभा निवडणुकीचा राज्याचा कल स्पष्टपणे महायुतीला मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश क्षीरसागर आणि विधानसभेत विजयाची हॅट्ट्रिक करणारे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदासाठी शिंदे यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे. तर ज्येष्ठत्वाचा मुद्दा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदेसमर्थक म्हणून हसन मुश्रीफ यांचा मंत्रिपदावर दावा कायम आहे. या जोडीला पालकमंत्रिपद तेही कोल्हापूरचेच मिळावे असे हसन मुश्रीफ यांची मागणी असणार हे उघड आहे.
आमदार विनय कोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मागील पाच वर्षातील राजकीय चढउतारीच्या वेळी विनय कोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भक्कम साथ दिली आहे. याशिवाय जनसुराज्यच्या दोन जागा कोल्हापुरातून निवडून आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कोरे यांनी जनसुराज्य पक्षाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना जाहीर केला होता.
मुख्यमंत्री पदाच्या शपथ ग्रहण समारंभात आमदार विनय कोरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत मुक्त वावर होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ असल्याने विनय कोरे यांना वजनदार कॅबिनेट मंत्रिपद मिळेल असे संकेत आहेत. राजेंद्र पाटील–यड्रावकर यांनी मागील निवडणुकीनंतर ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री होते. बदलत्या राजकारणात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले. अडीच वर्षात मंत्रिपद मिळाले नाही, आता नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचे यड्रावकर हेही दावेदार मानले जातात. कोल्हापुरातून तीनही पक्षातून मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी मोठी असली तरी सस्पेन्स कायम आहे.








