डेअरीतील संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी होणारच : जनावर खाद्य प्रकल्प पशुसंवर्धन खात्याकडे देणार,सहकारी संस्थांमध्ये 12 हजार कोटींच्या ठेवी
पणजी : वाढीव दराने गोवा डेअरी दूध खरेदी करत असेल, तर त्याची चौकशी केली जाईल. गोवा डेअरीचा कारभार सुधारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारने सहकार कायद्यात दुऊस्ती केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 40 संचालक निलंबित झाले आहेत. निलंबित झालेल्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल बुधवारी विधानसभेत सांगितले. डेअरीमार्फत जनावरांसाठी खाद्य तयार करणारा प्रकल्प पशुसंवर्धन खात्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. प्रकल्पाचा लिलाव घेऊन तो चालवण्यास दिला जाईल. सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कारभार पारदर्शीपणे व्हावा यासाठी सहकारी संस्थांचे दरवर्षी लेखा परीक्षण होईल. सहकारी संस्थांमध्ये 12 हजार कोटींहून अधिक ठेवी आहेत, असेही ते म्हणाले. विधानसभेत बुधवारी सहकार खात्याच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेला उत्तर देताना मंत्री शिरोडकर यांनी वरील माहिती दिली. सहकार खात्याचे वर्षभरात डिजिटलायजेशन होईल. यामुळे सर्व सहकारी संस्थांना आपली माहिती ठेवणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.









