आरपीआयकडून मागणी
प्रतिनिधी /वास्को
महिलेला मारहाण केल्या प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱयाविरुद्ध वेर्णा पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद झालेला आहे. या पोलिसाला सेवेतून त्वरित निलंबीत करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(कांबळे) गोवा शाखेने केली आहे.
या संबंधी आरपीआय गोवा शाखेच्या पदाधिकाऱयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस तुळशिदास परवार, पोलिसाविरुध्द तक्रार केलेली महिला समीना शेख व तिचा पती सलीम शेख व मांगोरहिल शाखेच्या सरचिटणीस आरती टेंकळे उपस्थित होत्या. सलीम व समीना या आरपीआयशी संबंधित असून शेख कुटुंबाला पोलिसांपासून धोका असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. तुळशिदास परवार यांनी व तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीची घटना शुक्रवारी वेर्णात घडली होती. तक्रारदार व तिचा पती एक मालमत्ता पाहण्यासाठी वेर्णा भागात एका ठिकाणी गेले असता त्या पोलिसाची व त्यांची गाठ पडली. या ठिकाणी त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर पोलिसाने या पती पत्नीवर हात उगारला. सदर पोलिसाचे नाव आशिष नाईक, असे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याविरूध्द वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आलेली आहे.
पोलीस हे लोकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना न्याय देण्यासाठी असतात. पोलिसानेच एका महिलेवर हात उगारणे हे गैर असून सदर पोलिसाला सेवेतून निलंबित करण्यात यावे. यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस संचालक यांनाही निवेदन देण्यात येईल. पोलिसाविरुद्ध कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असे आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस तुळशिदास परवार यांनी म्हटले आहे.









