उद्धव ठाकरेंची सेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, याचिका सादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खरी शिवसेना कोणती? एकनाथ शिंदे गटाची की उद्धव ठाकरे गटाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोहचलेला असतानाच उद्धव गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका सादर केली आहे. आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची हा निर्णय घेऊ नये अशी मागणी करत आयोगाच्या प्रक्रियेवर स्थगिती याचिकेत मागण्यात आली आहे. आयोगावर काही आरोप करण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत त्यांच्या अधिकारासंबंधीची कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक आयोग विनाकारण घाई करत आहे, असे ठाकरे गटाच्या याचिकेत प्रतिपादन करण्यात आले आहे. प्रथम न्यायालयात प्रलंबित असलेला आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा प्रश्न सुटू द्या. नंतर शिवसेना कोणाची या विषयावर निवडणूक आयोगासमोर निवाडा करणे योग्य ठरेल, असेही याचिकेत सांगण्यात आले आहे. या याचिकेची सुनावणी 1 ऑगस्टलाच होणे शक्य आहे.
कृत्रिम बहुमत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने कृत्रिम बहुमत निर्माण केले आहे. हे सरकार अवैध असून ते रद्द केले जावे, अशी मागणी करणारी याचिका यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरु केली तर पक्षाची न भरून येणारी हानी होऊ शकते. जी बाब न्यायालयात प्रलंबित आहे, त्या बाबीची चौकशी करणे हे न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे. तसेच यामुळे न्यायालयाची अवमानना होऊ शकते, असे उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेत सांगण्यात आले आहे.
शिंदे गटाचे प्रतिपादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्याबरोबर शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार असल्याचे प्रतिपादन करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आयोगाने त्याच्या पत्राची दखल घेऊन दोन्ही गटांना त्यांची कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला आहे.
ठाकरेंनी मागितली हमी
27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यादिवशी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपल्या पुष्पगुच्छ देऊ नयेत. तर ठाकरे यांच्या शिवसेनेवरच आपला विश्वास असून याच शिवसेनेशी आपण एकनिष्ठ आहोत, असे प्रतिज्ञापत्र द्यावे. तसेच जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडण्याची हमी द्यावी. ती आपल्याला वाढदिवसाची भेट ठरेल, अशी मागणी ठाकरे यांनी केली.









