घटनास्थळावरून पोबारा ः बामियाल सेक्टरमध्ये शोधमोहीम
@ वृत्तसंस्था/ पठाणकोट
पंजाबच्या पठाणकोट जिल्हय़ातील बमियाल सेक्टरमध्ये पहाडीपूर चौकीजवळ शनिवारी रात्री 2 ते 3 संशयास्पद लोक दिसले. त्यांच्यावर बीएसएफ जवानांनी 4 राऊंड गोळीबारही केला. यानंतर स्थानिक पोलिसांसह बीएसएफ जवानांनी शोधमोहीम राबवली. मात्र, ते सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडले नाहीत. रात्रीची वेळ असल्यामुळे संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
नरोट जमाल सिंग पोलीस स्टेशन अंतर्गत पहाडीपूर गावात सुरक्षा जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती डीएसपी सुमीर सिंह यांनी दिली. पहाडीपूर पोस्टवर, बीएसएफ जवानांनी भारत-पाक सीमेवरील शून्य रेषेवर पाकिस्तानच्या बाजूने सुमारे 3 लोकांची हालचाल पाहिली. जवानांनी सुमारे 4 राऊंड गोळीबारही केला. पोलीस आणि बीएसएफने संयुक्त कारवाई सुरू केली, परंतु अद्याप काहीही संशयास्पद सापडलेले नाही. संशयितांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी रविवारी सकाळीही झिरो लाईनजवळ शोधमोहीम सुरू होती. मात्र त्यादरम्यान जवानांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.









