कोल्हापूर :
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताचा प्रयत्न आणि गर्भपाताचे औषधे दिल्याप्रकरणी अटक केलेल्या कळंबा (ता. करवीर) येथील श्रध्दा हॉस्पिटलच्या डॉ. दिपाली सुभाष ताईगडे (वय 46, रा. साई मंदिरसमोर, कळंबा, ता. करवीर), सुप्रिया संतोष माने (वय 42, रा. रायगड कॉलनी, कळंबा, ता. करवीर), धनश्री अरुण भोसले (वय 30 रा. शिंगणापूर, ता. करवीर) या तीन महिलांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिघींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कळंबा येथील श्री साई मंदिरासमोरील श्रध्दा हॉस्पिटलवर बुधवारी आरोग्य विभागाने छापा टाकला. या छाप्यादरम्यान हॉस्पिटलमध्ये सुयश हुक्केरी नामक तरुण गर्भवती महिलेची गर्भलिंग तपासणी करण्यासाठी सोनोग्राफी मशिन घेऊन आला. पण त्याला तपासणी आलेल्या डमी गर्भवती महिलेचा संशय आला. त्यामुळे त्याने या हॉस्पिटलमधून तत्काळ सोनोग्राफी मशिन घेऊन पळ काढला. या सुयश हुक्केरी तरुणाच्या शोधासाठी करवीर पोलिसाचे एक पथक कर्नाटकात रवाना झाले आहे.
पोलिसांनी संशयीत डॉ. दिपाली ताईगडे हिच्याविरोधी बेकायदेशिर गर्भलिंग निदान व गर्भपाताचा प्रयत्न करणे, गर्भपाताच्या औषधाचा अवैधपणे साठा करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे सापळा रचून, गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या सुप्रिया माने, धनश्री भोसले या दोन महिलांना अटक केली आहे. त्याच्याविरोधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तीन संशयीत महिलाकडून 1 लाख 43 हजार रुपयांची रोकड, गर्भपाताच्या गोळ्या, मोबाईल व अन्य साहित्य असा 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- सोनोग्राफी मशिनवाला ‘नॉट रिचेबल’
श्रध्दा हॉस्पीटलमध्ये गर्भवतीची महिलेची तपासणी करण्यासाठी सोनोग्राफी मशिन घेवून आलेला सुयश हुक्केरी याच्याविरोधीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागताच तो बुधवारी रात्रीपासूनच मोबाईल बंद ठेवून बेपत्ता झाला आहे. पोलीसांच्याकडून त्याचा शोध सुरु असून, तो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याने आजपर्यत किती गर्भलिंग निदान केले. याची माहिती समजणार आहेच. त्याचबरोबर तो अन्य किती डॉक्टरांच्या संपर्कात होता याची संपूर्ण माहिती पुढे येणार आहे, अशी माहिती करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
- गर्भपाताचे किट कोठून आणि कोणाकडून आणले याचा तपास सुरु
आरोग्य विभागाने गर्भपाताची औषधे देणाऱ्या ज्या दोन महिलांना अटक केली आहे. या महिलाकडे गर्भपात औषधाचे किट कोठून आणि कोणाकडून आणल्या आहेत. याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरु केली आहे. चौकशीमध्ये या दोन महिलांनी काय माहिती दिली. ती तपासाच्या नावाखाली पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे.








