पणजी : फसवणूक प्रकरणातील फरार असलेल्या संशयिताला ओल्ड गोवा पोलिसांनी बेळगाव, हुक्केरी सर्कल पोलिसांसह संयुक्त कारवाई करून शांताबान मेरशी येथे अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात भादंसं 420 व 406 कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहे. संशयित आरोपी कर्नाटकात लाखो ऊपयांचा गंडा घालून गोव्यात राहत होता. संशयिताचे लोकेशन गोव्यात मिळताच कर्नाटक पोलिसांनी ओल्ड गोवा पोलिसांशी संपर्क केला आणि संशयिताला शिताफीने अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयिताचे नाव महेश परसप्पा गुडली, (34 जमखंडी बागलकोट कर्नाटक) असे आहे. संशयिताने गोवा आणि कर्नाटक मिळून 93 लाखांची फसवणूक केली आहे. संशयित सप्टेंबर 2022 पासून कर्नाटकातील आपले ठिकाण बदलून आणि नंतर गोव्यात स्थलांतर करून अटक टाळत होता. गोव्यातील त्याच्या हालचालीची माहिती मिळाल्यावर कर्नाटक पोलिसांनी जुने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कारवाई सुरू केली. अखेर संयुक्त कारवाईत आरोपीला शांताबन, मेरशी येथे अटक करण्यात आली.









