सावंतवाडी –
गोवंश (प्राण्याचे ) मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी मोहम्मद सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा (45) (रा – सावंतवाडी बाहेरचावाडा) याला आज सकाळी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवार 29 मार्च रोजी सकाळी माडखोल येथे काही जागरूक नागरिकांनी त्याला कारसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली २ लाख किंमतीची कार, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 33 हजार रुपये रोकड, 38 हजार 115 रुपये किमतीचे प्राण्याचे मांस असा सुमारे २ लाख ८१ हजार ११५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मांस कुठून आणले ? या गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे का याच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयात 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली . त्यानुसार न्यायालयाने संशयित आरोपीला 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.









