आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीष गावडे यांनी पाहिले काम
मालवण । प्रतिनिधी
मालवण बोर्डिंग ग्राऊंड येथे क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवेशद्वारासमोरील मालवण-आचरा महामार्गावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी व धमकावल्याबाबत दाखल खटल्यातील आरोपी मनोज श्रीधर राऊळ (वय 40, रा. कणकवली ) याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले. दिनांक 16 जानेवारी २०२२ रोजी मालवण बोर्डिंग ग्राऊंड येथे क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवेशद्वारासमोरील मालवण-आचरा महामार्गावर गर्दी होती. तेथून मालवण येथील एक महिला जात असताना समोर असलेल्या आरोपीला संबंधित महिलेने बाजूला होण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन आरोपीने महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला व धमकी दिल्यामुळे फिर्यादी महिलेने मालवण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 354ब, 504,506 अन्वये तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये संशयिताला तपासकामी पोलीसांनी अटकही केली होती. मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करुन आरोपीविरुद्ध मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकारपक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी अंती तपासकामातील त्रुटी, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.









