तीन दिवसांपासूनच्या चर्चेनंतर निवडीवर शिक्कामोर्तब : राष्ट्रपतींनी केली संसद बरखास्त
वृत्तसंस्था/ काठमांडू
सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांचा शपथविधी शुक्रवारी रात्री राष्ट्रपती भवनात पार पडला. नेपाळमधील सत्तापालटानंतर तीन दिवसांनी लष्कर, राष्ट्रपती आणि जनरेशन-झेड नेत्यांच्या अनेक बैठकींनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता नव्या अंतरिम सरकारमध्ये कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता असून कुलमान घिसिंग, ओम प्रकाश अर्याल, बालानंद शर्मा यांचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी संसद बरखास्त केली आहे. जनरेशन-झेड नेते संसद बरखास्त करण्याच्या मागणीवर ठाम होते.
जनरेशन-झेड आंदोलकांनी नेपाळमध्ये सत्तापालट केला. संसद, राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान ओली यांच्या वैयक्तिक निवासस्थानांना आग लावण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत एका भारतीयासह 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान भारतीय पत्रकारांवर हल्ला आणि गैरवर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारीही दोन भारतीय पत्रकारांवर गैरवर्तन आणि मारहाण करण्यात आली.
नेपाळमध्ये नवीन अंतरिम सरकार स्थापनेसाठी तीन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल हे वेगवेगळ्या पक्षांशी सतत चर्चा करत होते. तथापि, शुक्रवारी सायंकाळी नेतानिवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. नेपाळच्या जनरेशन-झेड निदर्शनाचे नेते आणि राष्ट्रपती यांच्यात नवीन सरकार स्थापनेबाबत काही मुद्यांवर बरेच घमासान सुरू होते. या चर्चेदरम्यान राष्ट्रपती आणि लष्करप्रमुखांचीही भेट झाली होती. नेपाळच्या जनरेशन-झेड निदर्शनाच्या नेत्यांनी संसद बरखास्त करण्याची मागणी करत राष्ट्रपतींशी थेट भेट घेण्याची मागणी केली होती. अखेरीस नेपाळमध्ये के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटल्यानंतर सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान करण्यावर एकमत झाले. त्यांना काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचाही पाठिंबा मिळाला आहे.
सिंह दरबारमध्ये नवीन पंतप्रधान कार्यालय
नेपाळमधील सिंह दरबारमध्ये एक नवीन पंतप्रधान कार्यालय तयार करण्यात आले आहे. हे कार्यालय गृह मंत्रालयासाठी बांधलेल्या इमारतीत तयार करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी, निदर्शकांनी सिंह दरबार संकुलाच्या मुख्य इमारतीला आग लावल्यामुळे गृह मंत्रालयाच्या इमारतीत नवीन कार्यालय तयार करण्यात आले.
सुशीला कार्की यांची ओळख
सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1979 मध्ये वकिली क्षेत्रात कारकीर्द सुरू केली. 11 जुलै 2016 ते 6 जून 2017 पर्यंत त्या नेपाळच्या सरन्यायाधीश होत्या. 2017 मध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. सुशीला कार्की यांच्यावर पक्षपात आणि कार्यकारी यंत्रणेत हस्तक्षेप केल्याचा आरोप होता. सुशीला कार्की ह्या भारतसमर्थक असून त्यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती.
हॉटेल्स उद्योगाला मोठा फटका
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात हॉटेल उद्योगाचे आतापर्यंत 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. निदर्शकांनी काठमांडूच्या प्रसिद्ध हिल्टन हॉटेलसह अनेक हॉटेल्सना आग लावली आहे. देशभरातील सुमारे 20-25 हॉटेल्स लुटण्यात किंवा जाळण्यात आली आहेत. विशेषत: काठमांडूमधील हिल्टन सारख्या मोठ्या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आले आहे. हिंसाचारात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. निषेधाच्या 5 व्या दिवशी 17 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. यामध्ये गाझियाबादमधील एका भारतीय महिलेचा समावेश आहे.
भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न
काठमांडूमधील परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. सैन्य गस्त घालत असून दुकाने हळूहळू सुरू होत आहेत. कचरा साफ केला जात आहे. भारताने विशेष विमानांनी नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशातील 140 लोक सुरक्षित परतले आहेत. सोनौली आणि पानीटंकीसारख्या सीमांवरूनही अनेक भारतीय परत येत आहेत. दिल्ली-काठमांडू बस नेपाळमध्ये अडकली असून अयोध्येतील 8 प्रवासी हिल्समध्ये अडकले आहेत. दूतावासाने भारतीय व्हॉलीबॉल संघाची या हिंसाचाराच्या विळख्यातून यशस्वीपणे सुटका केली आहे.









