वार्ताहर /कुद्रेमनी
सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचा मारूती सूर्यवंशी याने कर्नाटक केसरी संगमेश बिरासदारला एकचाकी डावावर चीतपट करून शिनोळी खुर्दचे मैदान जिंकले.
शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील जयहनुमान कुस्तीगीर संघटनेच्यावतीने गुरूवारी निकाली कुस्त्यांचे मैदान भरविले होते. लहान-मोठय़ा चटकदार कुस्त्या या मैदानात झाल्या.
कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष अरूण पाटील, सरपंच नितीन पाटील, परशराम पाटील, राजू मनोळकर, प्रमोद पाटील, लक्ष्मण देसाई, परशराम डागेकर, नामदेव पाटील, विठ्ठल पाटील व मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन व विविध प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर कुस्त्यांना प्रारंभ झाला.
प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये दोन्ही मल्लांच्या कसदारपणा व अनुभवांमुळे हल्ला प्रतिहल्ल्यामुळे लढत रंगली होती. शेवटी 17 व्या मिनिटाला मारूती सूर्यवंशीने एकचाकी डावावर संगमेश बिरासदारवर प्रेक्षणीय विजय मिळविला. यावेळी गणपत बनोशी व हणमंत गुरव यांनी पंच म्हणून काम पाहिले.
दुसऱया क्रमांकाची कुस्ती मैदानाचे आकर्षण ठरली. महाराष्ट्र चॅम्पियन शाहू कुस्ती केंद्राचा विक्रम शिनोळी याने इचलकरंजीच्या सचिन निकम याला अवघ्या दोन मिनिटात हप्ते डावावर चीत करून मानाचा गदा व ढाल जिंकली. राजू शिनोळी याने शाहू आखाडय़ाचा मल्ल अक्षय पाटील याला पराभूत करून गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ ठेवलेली गदा व मेंढा जिंकला. तसेच हर्षद शिनोळी याने चटकदार कुस्ती करून मेंढा जिंकला.
दत्ता पाटील, रमाकांत कोंडुसकर, पांडुरंग पाटील (खानापूर), सोपान पाटील, प्रशांत पाटील, श्रीकांत कुटीहाळकर, चंद्रकांत पाटील कुस्तीगीर संघटना व पाहुण्यांच्या हस्ते प्रथम व दुसऱया क्रमांकाच्या कुस्त्या लावण्यात आल्या.
कुस्ती आखाडय़ामध्ये एकनाथ बेंद्रे, प्रसाद अष्टगी, प्रदीप शिंदे, यशवंत निटूरकर, विठ्ठल मोरे तुर्केवाडी, पृथ्वीराज कंग्राळी, रवी तुर्केवाडी, शुभम कंग्राळी, सुरज कडोली, रूपेश कर्ले कोडोली, ओंकार सावगाव, भरत मुतगा, शुभम कुद्रेमनी, गणेश फडके, संकल्प कंग्राळी, संभव शिनोळी, दर्शन शिनोळी, चेतन शिनोळी, साई शिनोळी, सौरभ सांगली, सुमीत कडोली, उत्कर्ष बोडकेनटी, संभा राशीवडे, समर्थ बेळगुंदी या मल्लांनी विजय नोंदविले. अन्य काही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.
यावेळी कुस्तीगीर संघटना सदस्यांचा, देणगीदार पाहुण्यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. कृष्णा चौगुले राशीवडे यांनी कुस्ती समालोचन केले.