वृत्तसंस्था/ मुंबई
दीर्घ कालावधीनंतर स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे. मुंबईने सोशल मिडियावर सूर्यकुमारचा व्हीडिओ पोस्ट करत ही माहिती दिली. काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव संघात परत असण्याची चर्चा सुरू होती. पण आता सूर्या संघात परतला आहे. इतकेच नव्हे तर सूर्याने संघात दाखल होताच लगेच सरावाला सुरुवात केल्याचे चित्र देखील शुक्रवारी पहायला मिळाले.
गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना सूर्यकुमारचा घोटा दुखावला होता. त्यावेळी किमान सात आठवडे तो खेळू शकणार नाही, असे सांगितले जात होते मात्र, त्याच्या वेदनांची तीव्रता वाढत गेली. यातच त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले होते. दोनच दिवसांपूर्वी सूर्या तंदुरुस्त झाला असून, त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय समितीने आयपीएल खेळण्यास मंजूरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले होते. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये सूर्या सहभागी होऊ शकला नाही. दुखापती आणि शस्त्रक्रियेनंतर, सूर्यकुमार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत होता. दरम्यान, एनसीएने तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित केल्यानंतर सुर्या मुंबई संघात दाखल झाला आहे. मुंबईच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून एकहाती सामना पलटवण्याची ताकद सुर्याची असल्याने मुंबईची ताकद वाढणार आहे.