आयसीसीकडून सन्मान : न्यूझीलंडचा रचिन रवींद्र क्रिकेटमधील उगवता तारा
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने नुकतीच टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली आहे. अल्पेश रमाजानी, मार्क चॅपमन आणि सिंकदर रझा यांना मागे सोडत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने हा पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे, दोन वेळा आयसीसी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा सूर्यकुमार यादव एकमेव खेळाडू आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार दोन वेळा जिंकता आला नाही. याशिवाय, न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रची आयसीसी पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. त्याने गेल्या वर्षी टी 20 क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने 18 टी 20 सामन्यामध्ये 48.86 च्या सरासरीने आणि 155.95 च्या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या. ज्यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने गेल्या वर्षी जानेवारीत राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या होत्या. या शतकासह तो रोहित शर्मानंतर टी 20 क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. याशिवाय, सूर्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्वही केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा तर, द. आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. या शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीने सूर्याचा सन्मान केला आहे.
न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचाही सन्मान
न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रची आयसीसी पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2023 मध्ये अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने गतवर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच 24 वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने या वर्षात 34.44 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत तर 23 विकेट्स घेतल्या आहेत.
महिला क्रिकेटमध्ये हिली मॅथ्यूज सर्वेत्तम
महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या हिली मॅथ्यूजला टी 20 वूमन क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मॅथ्यूज टी 20 प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार जिंकणारी वेस्ट इंडिजची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. 2023 मध्ये हिली मॅथ्यूजने दमदार कामगिरी केली होती.









