वृत्तसंस्था/ दुबई
सूर्यकुमार यादव सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खराब परिस्थितीतून जात असला, तरी बुधवारी आयसीसीकडून जाहीर झालेल्या पुरूषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या फलंदाजांच्या क्रमवारीत त्याचे अव्वल स्थान कायम राहिले आहे.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (811 गुण) आणि कर्णधार बाबर आझम (755), दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम (748) आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (745) यांच्यापेक्षा सूर्यकुमार 906 रेटिंग गुणांसह आघाडीवर आहे. विराट कोहली 15 व्या स्थानावर कायम आहे. सूर्यकुमारला ‘आयपीएल’मध्ये मात्र अजून सूर सापडू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये 15, 1 आणि 0 अशी त्याची कामगिरी राहिली आहे. पाकिस्तानची न्यूझीलंडविऊद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका शनिवारी सुरू होणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या बाबरला सूर्यकुमारला मागे टाकण्याची संधी त्यात मिळेल.
नुकत्याच झालेल्या ‘टी20’ मालिकेत सहभागी झालेल्या न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचे फळ या क्रमवारीत मिळालेले असून श्रीलंकेचा तरुण फिरकी गोलंदाज महेश थेक्षाना सर्वांत जास्त लक्षवेधी ठरला आहे. हा 22 वर्षीय खेळाडू कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग स्तरावर पोहोचला असून गोलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आलेला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान हा ‘टी20’ गोलंदाजांच्या यादीत देशबंधू फझलहक फाऊकी, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांच्याही पुढे आघाडीवर आहे. आघाडीच्या 10 गोलंदाजांच्या यादीत एकही भारतीय नाही.
बांगलादेशने मीरपूरमध्ये आयर्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर कसोटी क्रमवारीतही काही बदल झाले आहेत. अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने 126 आणि नाबाद 51 धावांची केलेली खेळी त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 17 व्या स्थानावर पोहोचवून गेली आहे, तर गोलंदाजांच्या यादीत तैजुल इस्लाम आणि शाकिब अल हसन या फिरकी जोडीला स्थान मिळालेले आहे.









