वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या पुऊषांच्या ‘टी20’ क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. इतकेच नव्हे, तर तो पहिल्या दहा खेळाडूंमधील एकमेव भारतीय आहे. न्यूझीलंडचा मार्क चॅपमन आणि पाकिस्तानचा इफ्तिकार अहमद यांनी या दोन्ही संघांदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या अखेरीस कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान प्राप्त करण्यात यश मिळविले आहे.
चॅपमनचे मागील सर्वोत्तम स्थान फेब्रुवारी, 2018 मध्ये 54 वे होते. पण त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दोन सामन्यांत 42 चेंडूंत 71 धावा आणि 57 चेंडूंत 104 धावा अशा नाबाद खेळी करत एकूण 290 धावा जमवून 48 स्थानांची बढती मिळविलेली आहे. तो आता 35 व्या स्थानावर पोहोचलेला आहे.
अंतिम सामन्यात 36 धावा काढणारा इफ्तिकारही सहा स्थानांची प्रगती करत संयुक्तरीत्या 38 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानी खेळाडूंमध्ये अंतिम सामन्यात नाबाद 98 धावा काढणारा मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्यानंतर त्याचे नाव येते. सूर्यकुमार यादव अग्रभागी असलेल्या या क्रमवारीत रिझवान दुसऱ्या, तर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. इफ्तिकारच्या वाट्याला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये 43 वा क्रमांक आला होता होता आणि ते त्याला लाभलेले तोवरचे सर्वोच्च स्थान होते.









