इस्रोने रचला इतिहास : सौर मिशनचे मोठे यश : सूर्याचे रहस्य उलगडणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) शनिवारी देशाचे पहिले सौर मोहिमेवर आधारित ‘आदित्य-एल1’ अंतराळयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावरील अंतिम गंतव्य कक्षेत यशस्वीपणे पोहोचवले. हे यान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉईंट-1 (एल1) भोवती प्रभामंडल कक्षेत परिभ्रमण करत राहणार आहे. ‘आदित्य-एल1’ने हॅलो ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आणि इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
इस्रोचे आदित्य-एल1 अंतराळयान 127 दिवसात 15 लाख किमीचे अंतर कापून शनिवार म्हणजेच 6 जानेवारीला सूर्य-पृथ्वी दरम्यानच्या ‘एल-1’वर पोहोचले आहे. एल-1 बिंदू हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का आहे. एल1 पॉईंट भोवती प्रभामंडल कक्षेत उपग्रहातून सूर्य सतत दिसू शकतो. तसेच या पॉईंटवर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुऊत्वाकर्षण निष्क्रिय होत असल्याने आता भारतीय अंतराळयान परिभ्रमण करत राहणार आहे. 400 कोटी ऊपयांचे बजेट असलेला हा प्रकल्प सूर्याचा कोरोना थर, त्याचे वातावरण, एल-1, सूर्याची किरणे, त्याची भूत-भविष्यातील स्थिती आदींचा अभ्यास करणार आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीही आनंद व्यक्त करत आपल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
2 सप्टेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024
‘आदित्य-एल1’ ध्रुवीय उपग्रह पीएसएलव्ही-सी57 च्या मदतीने 2 सप्टेंबर 2023 रोजी पृथ्वीवरून रवाना करण्यात आले होते. यानंतर भारताचा ‘आदित्य-एल1’ पुढील 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले. त्यानंतर ते हळूहळू पृथ्वीच्या इतर कक्षांमध्ये ऑन-बोर्ड प्रोपल्शन वापरून परिभ्रमण करत होते. पाच फेऱ्या मारल्यानंतर ते पृथ्वीच्या गुऊत्वाकर्षण क्षेत्रातून पुढे पाठवण्यात आले. पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर त्याचा क्रूझ टप्पा सुरू झाला. इस्रोने पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत वेगवेगळ्या स्तरांच्या विभक्तीनंतर प्रथम सूर्यमोहीम स्थापित केली आहे.
127 दिवसांचा कालावधी
‘आदित्य-एल1’चा एकूण प्रवास 127 दिवसांचा आहे. एल-1 पॉईंट सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का म्हणजेच पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. ‘आदित्य-एल1’ हॅलो ऑर्बिटमध्ये एल-1 पॉईंटवर पोहोचले आहे. या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी ‘आदित्य-एल1’ला 127 दिवसांचा कालावधी लागला. या प्रवासात अवकाशयानाला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जाताना आव्हानात्मक टप्पे पार करावे लागले.
आव्हानात्मक कामगिरी
सूर्याचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 9,941 डिग्री पॅरेनहाइट आहे. आतापर्यंत सूर्याच्या बाह्या कोरोनाचे तापमान मोजले गेले नाही. हे लक्षात घेऊन आदित्य-एल1 हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का अंतरावर असलेल्या एल1 च्या जवळच्या कक्षेत 15 लाख किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य-एल1चे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रिया पार करत त्याची वाटचाल सुरू होती.
पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सौर मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ‘भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-एल1 आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात जटिल अंतराळ मोहिमांपैकी एक साकार करण्यासाठी आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे हे मोठे योगदान आहे. ही कठोर परिश्रमांची फलप्राप्ती आहे. या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्यात मी माझ्या देशवासियांसमवेत आहे. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पादाक्रांत करत राहू, असे म्हटले आहे.
‘इस्रोने आणखी एक यशोगाथा लिहिली’
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही इस्रोच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आदित्य-एल1 सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचले आहे. हे वर्ष भारतासाठी अतिशय आश्चर्यकारक ठरले आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली इस्रोने आणखी एक यशोगाथा लिहिल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.









