वादग्रस्त कळसा-भांडुरा प्रकल्प : गोव्याची मात्र न्यायालयावरच भिस्त.धरणाचे क्षेत्रफळ, उंची, रुंदी केली कमी.परवाने मिळविण्यासाठीच केला बदल
पणजी : कर्नाटकातील कणकुंबी (ता.खानापूर) येथील कळसा-भांडुरा नाला प्रकल्पाचे, सर्वेक्षणाचे तसेच पाणी वळवण्याची जागा अधोरेखित करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती हाती आली आहे. सदर प्रकल्पाच्या अहवालास पेंद्रीय जल आयोगाने यापूर्वी मान्यता दिली असून नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या अहवालानुसार कळसा, सुर्ला, हलतारा नद्यांचे सर्वेक्षणाचे, तसेच जागा अधोरेखित करण्याचे कामही कर्नाटकाने पूर्ण केले आहे. मात्र त्याबाबत गोवा सरकारने अद्यापही कोणतीच प्रतिक्रिया दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गोवा जलस्रोत खात्याच्या म्हादई विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप नाईक हे शनिवारी कणकुंबी येथे पाहणी करण्यासाठी गेले असता वरील गोष्ट त्यांच्या नजरेस आली. ते या प्रकरणी सविस्तर अहवाल गोवा सरकारला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्याची न्यायालयावरच भिस्त
विद्यमान परिस्थितीनुसार गोवा सरकार फक्त न्यायालयीन लढाईवरच जास्त अवलंबून राहत असल्याचे दिसत असून तेथे प्रत्यक्षात होत असलेल्या अनेक गोष्टींची गाभीर्याने दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम नेले गोवा म्हादई अभयारण्यापासून लांब
कळसा-भांडुरा प्रकल्पाची अगोदरची जागा कणकुंबीच्या राखीव वनक्षेत्रात होती आणि ती गोवा म्हादई अभयारण्यापासून सुमारे 230 मीटर अंतरावर होती. परंतु आता ती जागा बदलण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून नवीन जागा म्हादई अभयारण्यापासून 3 ते 5 किमी लांब अंतरावर नेली आहे. कर्नाटक निरावरी निगम लिमिटेडने हा बदल केला असून तेथील प्रकल्पाची जागाही अधोरेखित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
धरणाची उंची, रुंदी केली कमी
आधीच्या प्रकल्प अहवालात कर्नाटकाने काही बदल केले असून सुधारित अहवालासही केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवली आहे. कर्नाटकने सदर प्रकल्पाचे क्षेत्रफळ काही प्रमाणात कमी केले असून त्यातील धरणांची उंची, रुंदी देखील कमी केल्याचे आढळून आले आहे.
परवान्यांसाठी केला बदल
केंद्रीय वन मंत्रालय व इतरांचे परवाने प्राप्त व्हावेत म्हणून हे बदल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. सुधारित प्रकल्प अहवालानुसार परवाने मिळावेत म्हणून कर्नाटकाने प्रयत्न चालवले असून गोवा सरकारकडून मात्र न्यायालयीन वळगता अन्य विशेष अशा कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत.









