सात तालुक्यांत प्रभागनिहाय नोंदणी : अन्य तालुक्यांतील मच्छीमारांत संभ्रम
प्रतिनिधी / पणजी
गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (जीसीझेडएमए) मच्छीमारांच्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविण्यात आले असून ते खासगी एजन्सीमार्फत होणार आहे. या कामासाठी प्राधिकरणाने निविदा जारी केली असून फक्त निवडक तालुक्यांपुरतेच ते काम करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांसाठी एकच एजन्सी न ठरवता प्रत्येक तालुक्यासाठी वेगळी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे.
बार्देश, फोंडा, पेडणे, तिसवाडी, सालसेत, काणकोण, मुरगांव या सात तालुक्यांचीच सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. फक्त 7 तालुके आणि स्वतंत्र एजन्सी हा प्रकारच आश्चर्यकारक असल्याचे त्या निविदेतून दिसून येत आहे. डिजीपीएस पद्धतीने मच्छीमारांच्या घरांचे सर्वेक्षण होणार असून ते वॉर्ड प्रमाणे केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात मच्छीमारांची किती घरे आहेत याचा तपशील सर्वेक्षणानंतर उपलब्ध होणार आहे. हे सर्वेक्षणाचे काम 120 दिवसांनी पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
उर्वरित 5 तालुक्यात हे सर्वेक्षण होणार नसल्याने तेथे मच्छीमारांची घरे नाहीत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या तालुक्यांना सर्वेक्षणातून का वगळण्यात आले, याचाही खुलासा जीसीझेडएमएने केलेला नाही. त्यामुळे या सर्वेक्षणाबाबत मच्छीमार वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.









