महापौर मंगेश पवार यांची वनखाते, हेस्कॉम अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहर आणि उपनगरांतील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून संबंधित धोकादायक झाडे तातडीने हटविण्यात यावीत, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी वनखाते, हेस्कॉम आणि पर्यावरण अधिकाऱ्यांना केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी आपल्या कक्षात बागायत खाते, वनविभाग, हेस्कॉम आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. उपस्थित होत्या. पावसाळा तोंडावर आला असल्याने पावसाळ्यात धोकादायक झाडे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्कॉमचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
त्यामुळे शहर व उपनगरात तातडीने सर्व्हे काम हाती घेऊन ए, बी, सी अशा पद्धतीने झाडांचा सर्व्हे करावा, अशी सूचना मनपा आयुक्त शुभा बी. यांनी केली. पावसाळ्यात आपत्कालीन काळात नाले आणि गटारींच्या सफाईसाठी महापालिका सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बैठकीला वनखात्याचे शहर वनक्षेत्रपाल पुरुषोत्तम राव, साहाय्यक वनक्षेत्रपाल विनय गौडर, हेस्कॉमचे अधिकारी अश्विन शिंदे, सत्ताधारी गटनेते अॅड. हनुमंत कोंगाली, पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी आदी उपस्थित होते.









