वनखाते-महापालिका सक्रिय : पाहणीनंतर जीर्ण झाडांवर लवकरच कारवाई
बेळगाव : शहरातील धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनखात्याने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. वादळी वारे आणि पावसामुळे धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची दखल घेत वनखाते आणि मनपातर्फे शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे केला जात आहे. आयुर्मान संपलेली आणि कमकुवत झालेली झाडे लवकरच हटविली जाणार आहेत, अशी माहिती वनखात्याने दिली आहे. शहरात आयुर्मान संपलेल्या जुनाट वृक्षांची संख्या मोठी आहे, अशी झाडे वादळी वाऱ्यात धोकादायक ठरू लागली आहेत. झाडे आणि फांद्या कोसळून खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ लागले आहे. दरम्यान, धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी शहरवासियांतून होऊ लागली आहे.
त्यानुसार वनखात्याने धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी सर्वेक्षणाची मोहीम सुरू केली आहे. शहरातील भाग्यनगर, अनगोळ, शिवाजीनगर, खासबाग, शहापूर, टिळकवाडी, यासह विविध भागातील आणि मुख्य रस्त्यावरील वृक्षांचे सर्वेक्षण केले जात आहे. वळिवाच्या वादळी पावसाने झाडे आणि फांद्या कोसळून वाहने, घरे, विद्युतखांब, व्यावसायिक दुकाने, शेड आदींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे धोकादायक वृक्षांचा प्रश्न समोर आला आहे. वनखाते आणि मनपामार्फत अशा धोकादायक झाडांची पाहणी केली जात आहे. शिवाय लवकरच झाडे हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. विशेषत: झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किटसारखे प्रकार घडू लागले आहेत. तर बाजारपेठेत धोकादायक फांद्यांमुळे व्यावसायिकांना फटका बसू लागला आहे. अशा झाडांचा सर्व्हे केला जात आहे.









