दोन वर्षांपासून गाजत असलेल्या ज्ञानवापी प्रकरणात एक महत्वाचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार आता या संपूर्ण परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या परिसरात सध्या जी मशीद आहे, ती पूर्वी तेथे अस्तित्वात असलेल्या हिंदू वास्तूवर उभी करण्यात आली आहे काय. याचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणातही अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आला होता. रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय देण्यात येऊन ही संपूर्ण भूमी रामलल्ला विराजमान या मूर्तीच्या स्वामित्वाचीच आहे, असा निर्वाळा पाच सदस्यांच्या पीठाने एकमुखी दिला होता. त्या प्रकरणात न्याय करताना शास्त्रीय सर्वेक्षणाचे मोठे साहाय्य झाले होते. आता ज्ञानवापीचे सत्य शोधून काढण्यासाठी हेच सर्वेक्षण उपयोगी पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही ऐतिहासिक महत्वाच्या आणि प्राचीन वास्तूचे किंवा तिच्या परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण का केले जाते ? ते कसे केले जाते ? त्यावरुन विशिष्ट निष्कर्ष कसे काढले जातात ? या निष्कर्षांचा उपयोग संबंधित वास्तूसंबंधीचे विवाद मिटविण्यासाठी कसा होऊ शकतो ? या शास्त्रीय सर्वेक्षणाचे निष्कर्ष न्यायालयात कशा प्रकारे ग्राह्या मानले जातात ? असे अनेक प्रश्न ज्ञानवापीसंबंधीच्या न्यायालयाच्या आदेशाने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण संशोधन प्रक्रियेचा संक्षिप्त आढावा घेण्याचा हा प्रयत्न….
पार्श्वभूमी….
ड प्राचीन वास्तूंसंबंधी आपल्या सर्वांच्याच मनात एक आदराची आणि सन्मानाची भावना असते. आपली पुरातन संस्कृती, आपला इतिहास आणि आपला धर्म यांची ती प्रतिके असतात. आपला इतिहास ज्ञात करुन घेतल्याशिवाय वर्तमानातील आपली स्थिती नेमकी समजू शकत नाही, असा अनुभव आहे.
ड आपल्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी त्या काळापासून आजपर्यंत जी प्रतिके आपण जपलेली असतात, किंवा ज्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला उपलब्ध असतात त्यांचे परीक्षण करावे लागते. यावरुन आपला इतिहास किती जुना आहे आणि आपली संस्कृती कशी समृद्ध आहे याची शास्त्रशुद्ध माहिती मिळते.
ड इतिहासाचा मागोवा घेण्याचे अनेक मार्ग आहेत. ऐतिहासिक अधिकृत कागदपत्रे, भाषांचा विकास, तसेच पुरातत्व विभागाला उत्खननातून सापडलेले अवशेष यांचा अभ्यास करुन हा मागोवा घेतला जातो. हे तज्ञांचे काम आहे. या अभ्यासानंतर जास्तीत जास्त शक्यता लक्षात घेऊन निष्कर्ष काढले जातात.
ड विज्ञानाची जशजशी प्रगती होत गेली तसे पुरातत्व शास्त्रही अधुनिक बनले. आता इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अनेक वैज्ञानिक साधने उपलब्ध झाली आहेत. त्यात कार्बन डेटिंग, एरियल सर्वेक्षण, क्ष-किरण सर्वेक्षण आदी प्रक्रियांच्या माध्यमातून प्राचीन वास्तूंचा इतिहास आणि त्यांचे पुरातनत्व शोधले जाते.
शास्त्रीय संशोधनाचे महत्व
ड प्राचीन वास्तू आणि त्यांचा परिसर यांच्या शास्त्रीय संशोधनातून त्यांच्या संबंधातील सत्य समजून येते. अन्य कोणत्याही साधनांपेक्षा आधुनिक वैज्ञानिक साधनांच्या साहाय्याने केलेले संशोधन अधिक अचूक आणि विश्वासार्ह असते, असा अनुभव असल्याने अलिकडच्या काळात त्यावर अधिक भर दिला जातो.
ड शास्त्रीय संशोधन हे कमीत कमी कालावधीत होते. परिणामी सत्य काय आहे, याचा शोध लवकर लागतो. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने केलेल्या संशोधनावर वाद निर्माण होण्याची किंवा त्याचे परस्परविरोधी अर्थ निघण्याची शक्यता अत्यल्प असते. त्यामुळे सर्वसाधारणत: हे निष्कर्ष सर्वांना मान्य होण्याची शक्यता असते.
सत्य शोधण्याच्या विविध तंत्रवैज्ञानिक प्रक्रिया
- कार्बन डेटिंग-
ड कार्बन डेटिंग तंत्रज्ञान हे अगदी आधुनिक आहे असे नाही. त्याचा शोध लागून बरीच दशके लोटली आहेत. एखाद्या प्राचीन वस्तूचे वय किती, हे या तंत्रज्ञानातून बऱ्याच प्रमाणात अचूक समजते. याचाच अर्थ असा, की संबंधित वस्तू किंवा वास्तू नेमकी किती काळापूर्वी अस्तित्वात आली, हे समजू शकते.
ड कार्बन हे एक नैसर्गिक मूलद्रव्य आहे. कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या रचनेचा महत्वाचा भाग म्हणजे हे मूलद्रव्य असते. जसजशी वस्तू किंवा वास्तू वयाने मोठी होत जाते, म्हणजेच काळ जसजसा पुढे जातो, तसे वस्तूतील कार्बनमध्ये परिवर्तन होत जाते. या परिवर्तनाचे मापन करुन वय शोधले जाते.
ड कार्बनची कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 अशी तीन ‘समस्थानिके’ (आयसोटोप्स) आहेत. जसजसा वस्तूतील कार्बन ‘जुना’ होत जातो, तसतसे त्याच्या आयसोटोप्स किंवा समस्थानिकांमध्ये परिवर्तन होत जाते. या परिवर्तनाचा वेग किंवा गती सार्वसाधारणपणे निश्चित असते. त्यावरुन वय ठरविले जाते.
ड सर्वसाधारणपणे 5 हजार 730 वर्षांनंतर कार्बन 14 चे एक निर्धारित प्रमाण अर्धे होते. याला अर्धायुष्य कालावधी किंवा हाफ लाईफ पिरिएड असे म्हणतात. हे परिवर्तन किती प्रमाणात आहे, याचे मापन करुन रेडिओलहरी उपकरणांच्या साहाय्याने कार्बनचे वय काढले जाते. तेच त्या वस्तूचे सर्वसाधारण वय असते.
ड अशा प्रकारे प्राचीन वस्तूंचे किंवा वास्तूंचे वय निर्धारित केले जाते. यावरुन सदर वास्तू अगर वस्तू किती प्राचीन आहे हे समजते. तसेच ती कोणत्या काळात निर्माण केलेली असेल याचे अनुमान काढता येते. यावरुन ती कोणी निर्माण केली याचेही अनुमान काढता येते. अशा प्रकारे वाद मिटविण्यासाठी उपयोग होते.
ड कार्बन डेटिंगचा शोध 1949 मध्ये अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठात लागला. तेव्हापासून हे तंत्रज्ञान प्रचलित आहे. त्याचा उपयोग करुन प्राचीन लाकूड, कोळसा, बिया, हाडे, परागकण, केस, लोकर, चामडे, दगड, खडक, अष्म, भांडी, माती, कोरल, कागद, भिंतीचित्र आदी वस्तूंचे वय निर्धारित करता येते.
आकाश सर्वेक्षण
ड ड्रोन किंवा विमानात क्ष-किरण सोडणारे उपकरण बसवून त्याच्या साहाय्याने आकाशातून भूमींच्या आतील भागांचे सर्वेक्षण करता येते. एखाद्या वास्तूच्या, अर्थात इमारतीच्या खाली आणखीं एखादी प्राचीन वास्तू किंवा अशा वास्तूचे जोते (प्लिंथ) किंवा भिंती किंवा दरवाजे आहेत काय हे यातून शोधता येते.
ड या प्रक्रियेचा लाभ असा की प्रत्यक्ष खोदकाम न करता भूमीच्या आतल्या भागात दडलेल्या मोठ्या वस्तू शोधता येतात. अशा वस्तूचे नेमके स्थान समजल्यावर नेमक्या त्याच जागी उत्खनन करुन अधिक अभ्यास करणे शक्य होते. यामुळे वास्तू किंवा वस्तूची हानी न होता अंतर्गत शोध घेता येतो.
ड रामजन्मभूमी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असे क्ष-किरण संशोधन करण्यात आले होते. त्यातूनच बाबरी वास्तूच्या खाली आणखी एक अधिक प्राचीन वास्तू होती हे नेमकेपणाने समजले होते. त्यामुळे बाबरी इमारत रिकाम्या भूखंडावर बांधलेली नव्हती, हा महत्वाचा निष्कर्ष निघाला होता.
व्हिडीओ चित्रण
ड सूक्ष्म किंवा मोठ्या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने हे चित्रण केले जाते. ज्यास्थानी प्रत्यक्ष माणूस जाऊन पाहू शकत नाही, तेथेही सूक्ष्म कॅमेऱ्यांच्या आधारे चित्रण केले जाऊ शकते. अत्यंत अडचणींच्या जागी, गुहांमध्ये, पाण्याखाली किंवा भूमीखालीही ते केले जाऊ शकते. हे चित्रण कायमचे अस्तित्वात राहते, हा मोठा लाभ आहे.
ड व्हिडीओ चित्रणातून अतिशय जवळून पाहिल्याप्रमाणे दृष्य टिपता येते. अशा क्लोज लूकमुळे एखादी वस्तू किंवा वास्तू यांचा पृष्ठभाग अतिशय सूक्ष्मपणे चित्रित करता येतो. त्यावरील बारीकसारीक किंवा पुसट खाणाखुणाही स्पष्टपणे चित्रित करता येतात. त्यामुळे वास्तू किंवा वस्तूचे स्वरुप नेमके ओळखणे शक्य होते.
ज्ञानवापी संशोधनात उपयोग कसा होणार…
ड ज्ञानवापी परिसराच्या शास्त्रीय संशोधनाचा आदेश देण्यात आला आहे. या संशोधनात पुरातत्व विभागाकडून वर दिलेल्या तीन्ही प्रक्रियांचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्य समजण्यास साहाय्य होणार आहे. तसेच या प्रकरणातल्या पक्षकारांपैकी कोणाची बाजू सत्य आहे हे समजणार आहे.
ड कार्बन डेटिंगच्या माध्यमातून या परिसरात सापडलेल्या शिवलिंगाचे संशोधन केले जाईल. हे शिवलिंग आहे असे हिंदूंचे प्रतिपादन आहे. तर तो कारंजा आहे असे मुस्लीमांचे प्रतिपादन आहे. नेमके काय आहे हे समजू शकेल. तसेच ते कोणत्या काळात निर्माण झाले याचीही माहिती चांगल्यापैकी अचूकपणे मिळेल.
ड ज्ञानवापी परिसरातील मशीद ही हिंदूंची वास्तू किंवा प्राचीन मंदीराच्या जोत्यावर किंवा ढाच्यावर उभी करण्यात आली आहे का ? हिंदूंची वास्तू किंवा मंदीर पाडवून पाडविलेल्या वास्तूची साधनसामग्री उपयोगात आणून बांधली आहे का, याचाही शोध या शास्त्रीय सर्वेक्षणातून प्रामुख्याने लागणे शक्य आहे.
ड पुरातत्व विभागाने आकाशातून क्षकिरण किंवा रेडिओतरंग पद्धतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला तर सध्याच्या मशिदीच्या खाली हिंदू वास्तू किंवा मंदीर आहे काय याचीही माहिती मिळू शकेल. त्या आधारावर नंतर नेमक्या स्थानी उत्खनन करुन प्रत्यक्ष पुरावे मिळविणे या विभागाला शक्य होणार आहे.
ड अर्थातच, हे प्रकरण न्याप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आणि न्यायालयाच्या नियमांच्या अनुसारच हे संशोधन होणार आहे. या प्रकरणांची जेव्हा सुनावणी होईल तेव्हा या पुराव्यांचा उपयोग सत्य कोणाच्या पारड्यात आहे, हे निश्चित करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश महत्वाचा आहे.
ड पुरातत्व विभाग इतरही शास्त्रीय साधनांचा आणि प्रक्रियांचा उपयोग करण्यास स्वतंत्र आहे. कारण न्यायालयाने विशिष्ट तंत्रज्ञानच उपयोगात आणा, असा आदेश दिलेला नाही. त्यामुळे शक्य तितक्या सर्व शास्त्रीय साधनांचा उपयोग करुन या प्रकरणातील सत्य शोधण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा आपण बाळगू शकतो.
ड पुरातत्व विभाग आपला अहवाल सादर करेल तेव्हा त्याने काढलेले निष्कर्ष सर्वांना समजतील. तसेच त्यावर आपले मत व्यक्त करण्याची संधी सर्व पक्षकारांना दिली जाईल. अंतिमत: न्यायालयाचा निर्णय महत्वाचा असेल. शास्त्रीय सर्वेक्षणातून काढण्यात आलेल्या निष्कर्षांची भूमिका या सर्व प्रक्रियेत निर्णायक असू शकते.