ज्ञानवापीमध्ये 3-डी मॅपिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एएसआय पथकाकडून सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वेक्षणाचे काम सुरू होते. ‘एएसआय’कडून ज्ञानवापी पॅम्पसचे 3-डी मॅपिंग केले जात आहे. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समिती शनिवारी वाराणसीमधील मशिदीच्या ‘एएसआय’ वैज्ञानिक सर्वेक्षणात सामील झाल्यानंतर तज्ञांनी पॅम्पसचे 3-डी मॅपिंग सुरू केले. तळघराची रितसर पाहणी केल्यानंतर तिन्ही घुमटांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
ज्ञानवापी सर्वेक्षणाबाबत वाराणसीपासून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेवरून राजकारणही चांगलेच तापले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून एएसआयच्या पथकाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले. मुस्लीम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, पण तिथूनही त्यांना धक्का बसला होता. त्यानुसार वाराणसी न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे ज्ञानवापी पॅम्पसचे एएसआय सर्वेक्षण केले जात आहे.
‘एएसआय’ पथकाने शनिवारी संपूर्ण ज्ञानवापी पॅम्पसची स्वच्छता, मोजमाप आणि मॅपिंगचे काम पूर्ण केले. पश्चिमेकडील भिंतीसह आजूबाजूच्या भागात नमाज अदा केल्या जाणाऱ्या ठिकाणापासून मुख्य मशिदीच्या परिसराचे 3-डी इमेजिंग सध्या सुरू आहे. पथकाने व्यास कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या तळघराचीही पाहणी केली. जिल्हा प्रशासनाने सकाळी 8 ते संध्याकाळी 5 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणादरम्यान महिला फिर्यादीसह हिंदू पक्षाच्या सात आणि एआयएमच्या नऊ जणांना ज्ञानवापीमध्ये राहण्याची परवानगी दिली होती.









