बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर आणि निलजी येथे कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. बाधित रुग्णांवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. खबरदारी म्हणून दोन्ही गावांमध्ये आरोग्य खात्याकडून सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी येळ्ळूर येथील एका 25 वर्षीय गर्भवतीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बाधित गर्भवतीवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने व्हेंटीलेटर काढण्यात आल्याचे
डॉक्टरांनी सांगितले. यापाठोपाठ निलजी येथील एका 72 वर्षीय वृद्धालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्या रुग्णावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. निलजीच्या वृद्धाच्या प्रकृतीतही सुधारणा होत असून त्यांचे व्हेंटीलेटर हटविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेळगाव तालुक्यात कोरोनाने डोकेवर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांमध्ये संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, त्याचबरोबर आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व्हे हाती घेण्यात आला आहे. ज्या कोणाला ताप, खोकला, सर्दी झाली आहे, त्यांची माहिती गोळा केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरू नये. शंका वाटल्यास स्थानिक सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.









