कोल्हापूर :
बेळगाव–कोल्हापूर (कराड–धारवाड) रेल्वे मार्गचे सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. संकेश्वरमधून सर्व्हेला सुरुवात झाली आहे. धारवाड–कित्तूर–बेळगाव कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा प्रस्तावित रेल्वे मार्ग संकेश्वर आणि कोल्हापूरपर्यंत विस्तारलेला आहे. हा मार्ग झाल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.
सध्या पुण्यातील मोनार्क सर्वेयर्स अँड इंजिनियरींग कन्सल्टंटस् ही कंपनी रेल्वे मार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरणासह मार्गाचे सर्वेक्षण करत आहे. निपाणी ते कणगला औद्योगिक वसाहतीच्या सीमेपर्यंतच्या भागाचा नकाशा तयार करण्यासाठी संकेश्वरमध्ये ड्रोन कॅमेरे तैनात केले. हा मार्ग आंतरराज्य संपर्क यंत्रणा मजबूत करणारा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रहदारी कार्यक्षमता आणि आर्थिक वाढीला लक्षणीय चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्नाटक सरकारने रेल्वे महामंडळाला मोफत जमीन देण्यासह प्रकल्प खर्चातील 50 टक्के वाटा उचलण्याचे मान्य केले आहे. सर्व्हे करणारी टिम रेल्वे मार्गावर लाल आणि पांढरे पट्टे ओढून आरेखन करत आहेत. रेल्वे मार्गाला छेदणाऱ्या नाल्यांचा आकार व पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेची माहिती जमा केली जात आहे. सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार प्रकल्पाच्या अंमलबजावणीबान निर्णय घेतील.
कोल्हापूर–वैभववाडी सर्व्हेचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे
कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा सर्व्हे यापूर्वीच झाला आहे. या मार्गावर एका ठिकाणी तांत्रिक अडचण आल्याने तेथून मार्ग वळवला आहे. यामुळे 24 किलोमीटर जादा अंतर होत आहे. याचा केलेला सर्व्हेचा अहवाला रेल्वे बोर्डकडे गेला आहे. केंद्र सरकारकडून निधी मंजूर होतात. प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.








