जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासन करणार सर्वेक्षण
बेळगाव : जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अकरा तालुक्यांमध्ये संयुक्त सर्वेक्षण मोहीम हाती घेणार आहे. पुढील आठवड्यापासून ही कार्यवाही होणार आहे. शिवाय दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा सादर करावा लागणार आहे. कृषी खाते, बागायत खाते आणि महसूल विभागामार्फत ही संयुक्तपणे सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भाग दुष्काळाच्या सावटाखाली गेला आहे. विशेषत: भुईमूग, कांदा, ऊस आणि इतर पिकांना धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यंदा 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 4.80 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. शिवाय पावसाअभावी उर्वरित पेरणी रखडली आहे. बहुतांशी भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता सर्वेक्षण करणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा अभिप्राय घेण्यात आला आहे. गावोगावी फिरून माहिती मिळविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 11 तालुक्यांतील निवडक 110 गावांची निवड करून सर्वेक्षण केले जाणार आहे. याबाबत प्रथमत: संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे.
आठवड्याभरात सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ- नितेश पाटील (जिल्हाधिकारी)
पावसाच्या कमतरतेमुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय जलाशयाच्या पाणीपातळीबाबतही सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी काही गावांची निवड करण्यात आली आहे. पिकांची परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे. येत्या आठवड्याभरात या सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.









