केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था /कोची
एखादा व्यक्ती शेजाऱयाच्या घरात डोकावण्याच्या उद्देशाने सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकत नाही. कुणालाही सुरक्षेच्या नावावर शेजाऱयावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची अनुमती दिली जाऊ शकत नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्वतःच्या आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारशी सल्लामसलत करत सीसीटीव्ही कॅमेऱयांचा गैरवापर रोखण्यासाठी दिशानिर्देश जारी करावेत, असा आदेश न्यायाधीश व्ही. जी. अरुण यांनी राज्य पोलीस महासंचालकांना दिला आहे.
कोची येथील चेरनल्लूरमधील 46 वर्षीय महिलेने स्वतःच्या शेजाऱयाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाला विरोध दर्शवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱयाचा रोख महिलेच्या घराच्या दिशेने होता. महिलेने याला स्वतःच्या खासगीत्वाच्या अधिकाराचा उल्लंघन ठरवत न्यायालयात धाव घेतली होती.
महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत सीसीटीव्ही कॅमेरे लावून शेजाऱयांच्या घरावर पाळत ठेवण्याची अनुमती दिली जाऊ नये असे माझे प्राथमिक मत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कशाप्रकारे लावले जावेत यासंबंधी दिशानिर्देश जारी केले जावेत. राज्य पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारशी चर्चा केल्यावर योग्य दिशानिर्देश सादर करावेत असा आदेश न्यायाधीश अरुण दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता एक महिन्याने होणार आहे.









