वृत्तसंस्था / लिमा (पेरु)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज सुरुची इंदर सिंगने महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविताना आपल्याच देशाच्या ऑलिम्पिक नेमबाज मनु भाकरला मागे टाकले. मनुला रौप्य पदक मिळाले. सुरुची सिंगचे विश्व चषक नेमबाजी स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. ब्युनोस आयरीस (अर्जेंटिना) येथे झालेल्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुरुची सिंगने सुवर्णपदक मिळविले होते.
सुरुची सिंग हिचे वडील हवीलदार इंदर सिंग यांना आपली कन्या कुस्ती क्षेत्रात अव्वल महिला मल्ल व्हावी, असे वाटत होते. पण सुरुचीने कुस्ती क्षेत्राऐवजी नेमबाज क्षेत्रात प्रवेश करुन गेल्या दोन विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदके मिळवून दिली आहे.
18 वर्षीय सुरुची सिंगने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 243.6 गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले तर या क्रीडा प्रकारात भारताच्या मनु भाकरने 242.3 गुणासह रौप्य पदक आणि चीनच्या याओ क्वियानझूनने कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताने तीन पदकांची कमाई करत पदक तक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे. चीनने या स्पर्धेत पुरुषांच्या एअर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. भारताच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक घेतले. ब्युनोस आयरीस येथे झालेल्या स्पर्धेत सुरुचीने सौरभ समवेत 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात कांस्य पदक घेतले होते.
सौरभला कांस्य पदक
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सौरभ चौधरीने भारताचे पदक तक्त्यात खाते उघडले. या क्रीडा प्रकारात सौरभ चौधरीने कांस्यपदक मिळविले. चीनच्या हू केईने 246.4 गुणासह सुवर्णपदक घेतले. तर ब्राझीलचा ऑलिम्पिक पदक नेमबाज अलमेडा वूने रौप्य पदक मिळविले. सौरभ चौधरीने 219.1 गुणासह कांस्य पदक घेतले. या क्रीडा प्रकारात भारताच्या वरुण तोमरला पात्र फेरीमध्ये पाचवे स्थान तर अंतिम फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.









