अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आरोपीप्रमाणे काढली छायाचित्रे
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी फुल्टन काउंटी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करत फुल्टन काउंटी तुरुंगात नेले. ट्रम्प यांची पोलीस नोंदीत कैदी क्रमांक पी01135809 अशी नोंद करण्यात आली आहे. ट्रम्प यांची आरोपीप्रमाणे छायाचित्रे (मगशॉट) काढण्यात आली. तर 20 मिनिटांनी ट्रम्प यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर ट्रम्प हे अमेरिकेचे असे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत, ज्यांचा कैद्यांप्रमाणे मगशॉट घेण्यात आला. ट्रम्प यांनी मुक्ततेकरता 2 लाख डॉलर्सचा बॉन्ड भरला आहे.
मी काहीच चुकीचे केलेले नाही असा दावा ट्रम्प यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर पत्रकारांशी बोलताना केला आहे. ट्रम्प यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल पालटण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी करण्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांच्यासोबत आणखी 18 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
अटलांटामध्ये मगशॉट आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ट्रम्प यांनी सोशल मीडिया साइट ट्विटर (एक्स)वर पोस्ट केली आहे. तेथे त्यांनी स्वत:चा मगशॉट शेअर करत ‘इलेक्शन इंटरफेरेंस, नेव्हर सरेंडर’ असे नमूद केले आहे. ट्रम्प यांनी 2021 नंतर पहिल्यांदाच ट्विटवर एखादी पोस्ट केली आहे. ट्रम्प यांच्या या पोस्टवर ट्विटरचे सीईओ अॅलन मस्क यांनीही प्रतिसाद दिला आहे.
पोलिसांच्या नोंदीत बोटांचे ठसे
ट्रम्प यांना कक्षात नेत त्यांच्या बोटांचे पोलिसांनी ठसे घेतले आहेत. हे बोटांचे ठसे आता न्यायालय अन् पोलिसांच्या नोंदीचा हिस्सा असणार आहेत. ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनीही आत्मसमर्पण केले आहे. 15 ऑगस्ट रोजी अटलांटा येथील न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. आरोपपत्रात सामील 41 गुन्ह्यांपैकी 13 गुन्हे ट्रम्प यांच्यावर नोंद आहेत.
ट्रम्प यांच्याविरोधात अनेक गुन्हे
न्यायालयाने ट्रम्प यांना 25 ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत दिली होती. माजी अध्यक्षांवर 5 महिन्यात 4 गुन्हेगारी खटले नोंद झाले आहेत. त्यांच्यासोबत न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडॉल्फ गिउलियानी यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणूनबुजून निवडणुकीचा निकाल स्वत:च्या बाजूने करविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. सर्व आरोपी एका गुन्हेगारी संघटनेत सामील असल्याचे म्हटले गेले आहे. या सर्व आरोपींवर खोटी साक्ष देणे, फसवणूक, साक्षीदारांना प्रभावित करणे, राज्याला धोका देण्याचा कट रचणे, चोरीचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर गुन्हा रॅकेटियर अन् करप्शन ऑर्गनायझेशन अॅक्टच्या उल्लंघनाचा आहे, याप्रकरणी ट्रम्प यांना 20 वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.









