पाच जिल्ह्यांमधून संचारबंदी मागे
वृत्तसंस्था/ इम्फाळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर मणिपूरमधील बंडखोरांनी 144 शस्त्रे आत्मसमर्पण केली आहेत. यामध्ये एसएलआर 29, कार्बाईन, एके, इन्सास रायफल, इन्सास एलएमजी, एम29 रायफल आणि ग्रेनेडसारख्या हायटेक महागड्या रायफलचा समावेश आहे. तसेच आता बहुतांश जिह्यांमध्ये परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पाच जिल्ह्यांमधून शस्त्र संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. राज्यात 3 मे रोजी हिंसाचार उसळल्यानंतर सुरक्षा दलांची सुमारे 2 हजार शस्त्रे लुटण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
महिना उलटूनही राज्यातील हिंसाचार थांबत नसताना, गृहमंत्री अमित शहा 29 मे रोजी चार दिवसांच्या दौऱ्यावर मणिपूरला पोहोचले. गुऊवारी त्यांनी मणिपूरमधील लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका असे सांगितले. तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 2 जूनपासून शोधमोहीम सुरू होणार असल्याचे शहा यांनी सांगितले. कोणाकडे शस्त्रसाठा आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांनंतर जवळपास दीडशे बंडखोरांनी आत्मसमर्पण केले.
मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच राज्याचा दौरा केला. 29 मे ते 1 जून म्हणजेच 4 दिवस ते येथे राहिले. त्यांच्यासोबत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका हेही उपस्थित होते. शहा यांनी चार दिवसांच्या दौऱ्यात अनेक निर्णय घेत तणावपूर्ण वातावरण शमविण्यासाठी प्रयत्न केले.
अमित शहा 1 जूनच्या संध्याकाळी दिल्लीला परतण्यापूर्वी राज्याचे डीजीपी पी डोंगल यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी राजीव सिंग यांच्याकडे राज्य पोलीस दल सोपविण्यात आले आहे. तसेच शहा यांनी हिंसाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि हिंसाचाराशी संबंधित 6 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सीबीआयमार्फत समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाला. राजधानी इम्फाळला लागून असलेल्या सेराऊ आणि सुगनू भागात रविवारी हिंसक संघर्ष झाला. यामध्ये एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. तसेच राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत 98 जणांना जीव गमवावा लागला असून 310 जण जखमी झाले आहेत.









