दिघंची :
माण तालुक्यात्त रविवारी झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसाने राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव चक्क तीन दिवसात पूर्ण क्षमतेने भरला असून बुधवारी पहाटे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. इतिहासात प्रथमच ऐन मे महिन्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राजेवाडी तलाब पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
राजेवाडी तलावाचे साठवण क्षेत्र हे सातारा जिल्ह्यात, बंधारा सांगली जिल्ह्यात व लाभक्षेत्र सोलापूर जिल्हा अशी भौगोलिक रचना असलेला राजेवाडी तलाव हा महाराष्ट्रातील एकमेव तलाव आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास आटपाडी व तालुक्यातील व सांगोला तालुक्यातील सुमारे ५० हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येते. यावर्षी मे महिन्यातच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीलच तलावाची पाणी पातळी १२ फुटांवर होती. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याने राजेवाडी तलाव भरेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु तीन दिवसात माण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तीन दिवसात तलाब ओव्हरफ्लो झाला. इतिहासात प्रथमच मे महिन्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
२०२० पासून २०२२ पर्यंत सलग तीन वर्षे हा तलाब भरला होता. त्यानंतर मागील वर्षी आ. सुहास बाबर, तानाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने उरमोडी व जिहे कटापुर योजनेतून पुराच्या अतिरिक्त पाण्याने राजेवाडी तलाव भरून घेण्यात आला होता. यावर्षी तलाब कसा भरून मिळेल या काळजीत शेतकरी वर्ग असताना प्रचंड झालेल्या पावसाने तीनच दिवसात हा तलाव ओव्हरफ्लो झाला. राजेवाडी तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर अतिरिक्त पाणी लिंगीबरे येथील बंधारा, दिघंचीमधील गिड्ढे बस्ती बंधारा, माणगंगा नदीवरील यादव बस्ती बंधारा दिघंची मार्गे हे पाणी सांगोला तालुक्यात जाते. मागील दोन वर्षात राजेवाडी तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे तलावाच्या साठवण क्षमतेते वाढ झाली आहे. पूर्ण क्षमतेने तलाब भरल्यानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंचीमधील काही भाग राजेवाडी, लिंगीबरे, उंबरगाव, पुजारवाडी (दि), तर सोलापूर जिल्ह्यातील खवासपूर, कटफळ, महूद, चिकमहूद, अचकदानी, लक्ष्मीनगर या परिसरातील शेतकऱ्यांना लाभहोतो. राजेवाडी तलाव भरण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मागील वर्षी प्रथमच पुराच्या अतिरिक्त पाण्याने तलाब भरला होता. परंतु हा तलाव दरवर्षी भरून मिळावा यासाठी उरमोडी व जिहे कटापूर योजनेतून पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत आहे.








