आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम शुक्रवारी : स्वरमल्हार फौंडेशनअंतर्गत दिवाळी पहाट शनिवारी
बेळगाव : दिवाळीच्या फराळाबरोबरच सुश्राव्य गायनाचा आनंद बेळगावकरांना घेता येणार आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये आर्ट्स सर्कल आणि स्वरमल्हार यांच्यातर्फे संगीत मैफल होणार आहे. आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम शुक्रवार दि. 10 रोजी पहाटे 6 वाजता रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे. या मैफलीमध्ये प्राची जठार व मुग्धा गावकर यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अंगद देसाई व संवादिनीवर रविंद्र माने साथ करणार आहेत. स्वरमल्हार फौंडेशनअंतर्गत दिवाळी पहाटमध्ये शनिवार दि. 11 रोजी पहाटे 6 वाजता शारंग बेळुब्बी यांचे संवादिनी वादन व कारवारचे संकेत सप्रे यांचे शास्त्राrय गायन होणार आहे. त्यांना अंगद देसाई, राहुल मंडोळकर व सारंग कुलकर्णी साथ करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवारपेठ येथील अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात होणार आहे.
कलाकारांचे परिचय आर्ट्स सर्कल
प्राची जठार या बीए पदवीधर असून संगीताचे प्रारंभिक शिक्षण दामोदर च्यारी यांच्याकडे घेतले व सध्या पं. विजय बक्षी यांच्याकडे तालीम सुरू आहे. त्यांनी संगीत विषयात एमए पदवी घेतली असून गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. संगीताबरोबरच कीर्तनाची आवड असून ठिकठिकाणी त्यांनी कीर्तन आणि गायनाचे कार्यक्रम केले आहे. सम्राट संगीत सितारा या पारितोषिकाच्या मानकरी आहेत. संगीत भूषण पुरस्कार तसेच दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबईचा युवा अभिनेत्री आदी पुरस्कार मिळाले आहेत.
मुग्धा गावकर यांनी संगीत विषयात एमए परीक्षा सुवर्ण पदकासह उत्तीर्ण केली आहे. सध्या पीएचडीचा अभ्यास सुरू असून आकाशवाणीच्या शास्त्राrय अभंग व नाट्यागीताच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. अभिनव कला मंदिर या संस्थेच्या सचिव म्हणून काम करतात. वयाच्या सहाव्या वर्षापासून विजया नागराळी यांच्याकडे व त्यानंतर दामोदर च्यारी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. डॉ. लक्ष्मीकांत सहकारी यांच्याकडे संगीताचा अभ्यास केल्यानंतर संध्या मेवाती घराण्याचे गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे तालीम सुरू आहे. गोमंतक सा रे ग म पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार, गोमंत बालभूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रवींद्र माने कायद्याचे पदवीधर असून पं. रामभाऊ विजापूरे यांच्याकडे संवादिनी वादनाचे शिक्षण घेतले आहे. अंगद देसाई यांनी पं. बंडोपंत कुलकर्णी व संतोष कुलकर्णी यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेऊन सध्या पं. कल्याणराव देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेत आहेत.
स्वरमल्हार फौंडेशन
शारंग बेळुब्बी बेळगावचेच असून प्रारंभीचे शिक्षण सारंग कुलकर्णी यांच्याकडे झाले. सध्या डॉ. सुधांशु कुलकर्णी यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. त्यांना केंद्र सरकारची सीसीआरटी शिष्यवृत्ती मिळाली आहे. संकेत सप्रे हे कारवारचे असून सध्या ईशा फौंडेशन कोईमतूर येथे संगीत शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी पं. कैवल्यकुमार गुरव यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. संगीत विषयात एमए पदवी प्राप्त केली आहे. दोन्ही मैफली सर्वांना खुल्या असून रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केली आहे.









