प्रतिनिधी / कराड :
सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या सुर्ली घाटातील रस्त्याच्या कामासाठी वनविभागाची परवानगी मिळाली आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यास यश आल्याने वन हद्दीतील सुर्ली घाट रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कराड ते विटा राष्ट्रीय महामार्गावरील सुर्ली घाटात रस्ता अत्यंत खराब झाला आहे. कऱ्हाडहून जाताना सुरुवातीला आणि घाट संपताना रस्ता खूप खराब झाला आहे. कऱ्हाड व कडेगाव तालुक्यांच्या सीमेवर सुर्ली घाट आहे. या घाटात नेहमीच वर्दळ असते. अनेक लहान-मोठ्या गावांना कऱ्हाड बाजारपेठेशी जोडणारा हा रस्ता आहे. अवजड वाहनासह लहान-मोठ्या वाहनांची ये-जा येथून सुरू असते. गत वर्षी झालेल्या पावसाळ्यात जोरदार पावसाने रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. घाटाच्या सुरुवातीला तर रस्ता इतका खराब झाला आहे की वाहनधारकांकडून रस्ता सोडून बाजूने वाहन चालविण्यासाठी पसंती दिली जाते.
मुळात घाटातील रस्ता हा अरुंद आहे. वेडीवाकडी वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे मोठी वाहने चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच रस्ता खराब असल्याने खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त केला जावा, अशी मागणी प्रवासी व वाहनधारक करीत होते.
मात्र हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने यांच्या दुरूस्तीसाठी तांत्रीक अडचणी येत होत्या. याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी संबंधित वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांचेकडे लेखी व दूरध्वनीव्दारे सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे व वन विभागाने काम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षकांनी वनक्षेत्राच्या तपशीलानुसार अटी व शर्थीचे अधीन राहून रस्त्याच्या कामाला परवानगी दिली आहे.









