वृत्तसंस्था/ कार्डिफ
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याला गुडघा दुखापतीचा त्रास यापूर्वी वारंवार जाणवत आहे. दरम्यान भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर स्टोक्स या दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घेणार असल्याचे समजते. पुढील वर्षी होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मात्र स्टोक्स मुकण्याची शक्यता वर्तवली जाते.
बेन स्टोकस हा इंग्लंड संघातील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गुडघा दुखापतीची समस्या त्याला गेल्या काही महिन्यापासून सातत्याने त्रास देत आहे. अशा स्थितीत त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अॅशेस मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यात फलंदाजीत दर्जेदार कामगिरी केली होती. त्यानंतर न्युझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत तो आपल्या कामगिरीत सातत्य राखेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच समन्यांची कसोटी मालिका पुढील वर्षीच्या जानेवारीमध्ये भारतात होणार आहे. मात्र 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपण निश्चित सहभागी होऊ असे स्टोक्सने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









