दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नदी मोहिमेचे प्रणेते आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या चार आठवड्यांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तपासणी केली असता त्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आणि सूज आल्याचे डॉक्टरांना आढळल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 17 मार्च रोजी प्राप्त झालेल्या वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालात त्यांच्या मेंदूमध्ये गंभीर इजा आढळून आली होती. त्यानंतर सद्गुरूंना अपोलो दिल्ली येथे नेऊन शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सद्गुरूंच्या जीवाला संभाव्य गंभीर धोका असल्यामुळेच शस्त्रक्रिया केल्याचे दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये डॉ. विनीत सुरी यांच्यासह डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी यांचा समावेश होता.









