तासगाव / सुनील गायकवाड :
तासगाव एसटी बस स्थानकातून गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलांचे पर्समधील दागिने लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ १९ दिवसात पावने चौदा तोळे वजनाचे ५ लाख ४८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरट्यांचा हा सुळसुळाट रोखण्यासाठी पोलीस व एसटी महामंडळ यांनी संघटित प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
नेहमीच गर्दीचे ठिकाण म्हणजे एसटी बस स्थानक, बसस्थानकातून त्या-त्या बसव्दारे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिकची आहे. यावेळी बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी पाहवयास मिळते. आणि याचाच गैरफायदा चोरटे उचलताना दिसून येत असून तासगाव एसटी बस स्थानकात हे प्रमाण वाढत असताना दिसून येत आहे. केवळ १९ दिवसात तीन महिलांच्या पर्समधील ५ लाख ४८ हजार रूपये किंमतीचे पावने चौदा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत
तासगाव एसटी बस स्थानकातून दि.२८ एप्रिल २०२५ रोजी बसमध्ये चढत असलेल्या मंगल विलास चव्हाण (रा.चव्हाण मळा, ढवळी, ता. तासगाव) या ढवळीमार्गे जाणाऱ्या तासगाव-पलूस बसमध्ये चढ़त असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन काढून पर्समधील २ लाख ८ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असलेली डबी लंपास केली. त्यामध्ये गोल मण्यांची तीन पदरी सोन्याची ४० ग्रॅम वजनाची मोहनमाळ, तसेच प्रत्येकी ६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश आहे.
७ मे २०२५ रोजी दुपारी २ च्या दरम्यान छापा शिवाजी पाटील (रा.अंजनी ता. तासगाव) या तासगाव एसटी बस स्थानकातून तासगाव-जरंडी या गाडीला बसत होत्या. यावेळी बसला भरपूर गर्दी PLATFORM 8.9 होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्समधील दोन लाख रूपयांचे पाच तोळयांचे सोन्यांचे दागिने लंपास केले. त्यामध्ये अंदाजे तीन तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, अर्घा तोळा वजनाचे सोन्याचे लहान डोरले व अर्था तोळा वजनाचे सोन्याचे गळ्यातील दुशी यांचा समावेश आहे.
१६ मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान राधिका दीपक वाघ (रा. आरवडे, ता. तासगाव) या तासगाव बस स्थानकातून फलाट क्रमांक १० वरून सांगली ते इंदापूर जाणारे बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी वाघ यांच्या पर्समधील १ लाख ४० हजार किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
- पोलिसांची नियुक्ती गरजेची
तासगांव एसटी बस स्थानकात चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा, यासाठी कायम या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती गरजेची आहे. तसेच साध्या वेशातील पोलिसांनी अशा चोरट्यांचा शोध घ्यावा, असे ही बोलले जात आहे. तसेच तासगाव एसटी बस स्थानकात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र या सीसीटीव्हींची संख्या कमी आहे. ठराविक ठिकाणीच हे कॅमेरे असल्याने चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. परिणामी चोरट्यांचा शोध घेणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
- चोरट्यांचा बंदोबस्त करा
तासगाव एसटी बस स्थानकातून केवळ १९ दिवसात ५ लाख ४८ हजार रूपये किंमतीचे पावने चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास होणे, ही बाब गंभीर आहे. चार दिवसाच्या फरकाने होत असलेल्या या चोऱ्यांमुळे प्रवाशी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.








