नेदरलँडमध्ये सुरु केले नवे हॉटेल : सोशल मीडियावरुन दिली माहिती
वृत्तसंस्था / अॅमस्टरडॅम
भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज सुरेश रैना सध्या चर्चेत आहे. कारण आहे रैनाचे नवीन रेस्टोरंट, जे त्याने अॅमस्टरडॅम येथे (नेदरलँड) सुरू केले आहे. सोशल मीडियावर कुकिंग करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या रैनासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे. रैनाच्या रेस्टोरंटमध्ये सर्व पदार्थ हे भारतीय मिळणार आहेत. सोशल मीडियावरुन रैनाने आपल्या या नवीन रेस्टोरंटची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. ही पोस्ट शेअर करताना रैना म्हणाला की, ‘मला नेहमीच क्रिकेट आणि जेवण या दोन्ही गोष्टींची आवड राहिली आहे. रैना इंडियन रेस्टोरंट सुरु करणे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’. रैना स्वत: आपल्या या नवीन रेस्टोरंटमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा मिळत आहेत.









