शीख कैद्यांच्या सुटकेसाठी उपोषण
वृत्तसंस्था/ लुधियाना
लुधियानाजवळील हसनपूर गावातील रहिवासी सुरतसिंग खालसा (92) यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. तुरुंगात असलेल्या शिखांच्या सुटकेसाठी सुरतसिंग खालसा यांनी 2015 मध्ये उपोषण केले होते. तसेच ऑपरेशन ब्लूस्टारच्या निषेधार्थ नोकरी सोडल्यापासून ते सामाजिक जीवन जगत होते. शीख समाजामध्ये त्यांना आदर्श आणि आदरणीय मानले जाते. त्यांच्या निधनाने शीख समुदायावर शोककळा पसरली आहे. सुरतसिंग खालसा यांचे नाव त्यांच्या संघर्ष आणि बलिदानासाठी नेहमीच आठवणीत राहणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सुरतसिंग खालसा यांनी 16 जानेवारी 2015 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी लुधियानामधील आपल्या गावी हसनपूर येथे उपोषण सुरू केले. त्यांचा निषेध भारतीय आधुनिक इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या शांततापूर्ण आंदोलनांपैकी एक मानले जाते. आपल्या उपोषणाद्वारे त्यांनी शीख समुदायाच्या हक्कांसाठी आवाज उठवत सरकारकडून तुरुंगात असलेल्या शीखांच्या सुटकेची मागणी केली. त्यांच्या संघर्षामुळे देशभरातील शिखांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण झाली.









