डबल पॉवरद्वारे होणार वीजपुरवठा : 3 कोटी 70 लाख खर्चून घालणार भूमिगत वीजवाहिन्या.निसर्ग पर्यटनाला मोठी संधी
वाळपई : गोव्याचे माथेरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तरी तालुक्यातील सुरल गावाचा इको टुरिझम अंतर्गत विकास करण्याचा मानस आहे. यासाठी डबल पॉवर वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे ते सुरल दरम्यान अतिरिक्त भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येणार असून यासाठी 3.70 कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात सुरल येथील इको टुरिझमला चांगली संधी प्राप्त होणार आहे. सत्तरी तालुक्यातील ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरल गाव हा गोव्याचे माथेरान म्हणून ओळखला जात आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोवा कर्नाटक सीमेवरील या गावाला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून हे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे गोव्याचे माथेरान म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक खास करून उन्हाळा व पावसाळ्यात भेट देत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकास करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व इतर ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. याची दखल आमदार डॉ. देविया राणे यांनी घेऊन इको टुरिझमच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचा आराखडा तयार असून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येणार आहेत.
वीस वर्षांपूर्वी भूमिगत वाहिनीद्वारे वीजपुरवठा
हा गाव जरी गोव्याच्या अखत्यारीत येत असला तरी कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेवर आहे. यामुळे या गावांमध्ये सातत्याने विजेची समस्या निर्माण झाली होती. याची विशेष दखल घेऊन तत्कालीन या भागाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोळावली ते सुरल या दरम्यान भूमिगत वीज वाहिनी घालून या गावांमध्ये 24 तास विजेची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी याला जवळपास अडीच कोटी खर्च करण्यात आला होता.
3.70 कोटी खर्चून अतिरिक्त भूमिगत वीजवाहिनी
सध्या घालण्यात आलेली वीजवाहिनी चांगल्या प्रकारे काम करीत आहे. तरीसुद्धा येण्राया काळात इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन वीजवाहिनी घालण्यात येणार असून यासाठी 3.70 कोटी खर्च करण्यात येणार आहे. ठाणे गोळावली सुरल या मार्गाने भूमिगत वीजवहिनी जाणार आहे. यामुळे पावसाळ्यातील समस्येतून लोकांना दिलासा मिळणार आहे.
इको टुरिझमला मिळणार प्रोत्साहन
स्थानिक आमदार डॉ देविया राणे यांनी येथील इको टुरिझमला विकासाला विशेष प्राधान्य दिलेली आहे. याचा आराखडा तयार आहे. लवकरच प्रत्यक्षपणे या कामाला सुऊवात होणार आहे. तत्कालीन आमदार तथा आपले सासरे प्रतापसिंह राणे यांनी या भागामध्ये निसर्ग पर्यटनाद्वारे विकास व्हावा असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे आपोआपच सत्तरी तालुक्याच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलते
पावसाळ्यात या भागातील सौंदर्य आणखी खुलून दिसते. दाट धुके व डोंगरावरून कोसळणारे धबधबे हा नजारा विशेष देखणा आणि आकर्षक असते. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. जस्तीतजासत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. या भागांमध्ये इको टुरिझमला चांगला संधी आहे सुरल गाव हा म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात येत आहे. या भागांमध्ये सातत्याने पक्षांचा किलबिलाट असतो. येथील झुळझूळ वाहणारा वारा हे सर्व प्रकारच्या प्राण्यांसाठी एकप्रकारे अल्हादायक वातावरण आहेत. त्या आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी जरूर येथे भेट द्यावी.









