बृजबिहारी प्रसाद हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बिहारचे बाहुबली नेते आणि माजी मंत्री बृजबिहारी प्रसाद हत्याप्रकरणी माजी खासदार सूरजभान सिंहृ माजी आमदार राजन तिवारी समवेत 6 आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय योग्य ठरविला ओ. तर माजी आमदार मुन्ना शुक्ला समवेत दोन जणांना दोषी ठरविले आहे. न्यायालयोन मुन्ना शुक्ला यांना आत्मसमर्पण आणि तुरुंगात जाण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. राजद नेते असलेल्या शुक्ला यांनी अलिकडेच वैशाली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती.
26 वर्षांपूर्वी 13 जून 1998 रोजी पाटण्यातील इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या बृजबिहारी प्रसाद यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने 2009 साली सूरजभान, मुन्ना शुक्ला आणि राजन तिवारी समवेत 9 जणांना दोषी ठरविले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने मुन्ना शुक्ला समवेत मंटू तिवारीला शिक्षा सुनावली आहे.
पाटणा उच्च न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी 2014 मध्ये सूरजभान सिंहृ राजन तिवारी समवेत 9 आरोपींची मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात बृजबिहारी यांची पत्नी आणि माजी खासदार रमादेवी आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संजीव खन्ना, संजय कुमार आणि आर. महादेव यांच्या खंडपीठाने 22 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. खटल्याच्या प्रारंभी 15 आरोपी होते, परंतु सुनावणीदरम्यान काही आरोपींचा मृत्यू झाला होता.
प्रवेश घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात कैद बृजबिहारी यांच्यावर पाटण्यातील रुग्णालयात कडेकोट बंदोबस्तात उपचार सुरू होते. कमांडो आणि सुरक्षारक्षकांवर मात करत हल्लेखोरांनी बृजबिहारी यांची हत्या केली होती. या घटनेत तीन कमांडो आणि एक सुरक्षारक्षक मारला गेला होता. तर याच्या दुसऱ्याच दिवशी माकपचे आमदार अजित सरकार यांची हत्या झाली होती.