वृत्तसंस्था / झाग्रेब (क्रोएशिया)
येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा मल्ल सुरज वशिष्ट याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. पुरूषांच्या 60 किलो वजन गटात खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सर्बियाच्या टिबीलोव्हने सुरजचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेमध्ये भारताचे ग्रिकोरोमन प्रकारात खेळणाऱ्या मल्लांनी साफ निराशा केली आहे. रोटकच्या 19 वर्षीय सुरजने गेल्या जुलैमध्ये झालेल्या 20 वर्षांखालील वयोगटातील आशियाई कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत 72 किलो वजन गटात भारताच्या अंकित गुलीयाला कोरियाच्या नोव्हने पराभूत केले. तर 97 किलो गटात इराणच्या मोहम्मदी शेरावीने नितेशचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे एकमेव पदक महिलांच्या विभागात अंतिम पांगलने गुरूवारी मिळविले आहे. तिने 53 किलो वजन गटात कांस्यपदक घेतले आहे.









