पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे नेते व युतीच्या सरकारमधील नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नव्या भूमिकेमुळे पक्षात पडलेल्या उभ्या फुटीचे राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागांवर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. फुटीमुळे बारामतीसह राष्ट्रवादीच्या सर्व 4 लोकसभेच्या मतदारसंघातील जागा धोक्यात आल्या असून, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचे स्थान डळमळीत झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना जिंकणे सहजशक्य होणार नसल्याचा निष्कर्ष पोलिटिकल रिसर्च अँड ऍनालिसिस ब्युरो (प्राब) अर्थात प्राबने काढला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या 4 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे अजित पवार यांना समर्थन दिले आहे, तर शपथविधी समारंभाला हजेरी लावून पुन्हा साहेबांकडे परतेलेले शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील हे पवार साहेबांच्या बाजूने आहेत. मात्र, सातारा लोकसभेतही पवार यांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व हडपसर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजूनही संभ्रमात असले, तरी अजितदादांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार तूर्तास साहेबांना समर्थन देत असले तरी स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय समीकरण पाहून त्यांची वाटचाल दिसून येत आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अभेद्य आहे. खेडमधील आमदार मोहिते पाटील दोन्हीकडे समर्थन करून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा राजकीय स्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघात साहेबांच्या पक्षाला सहज जागा जिंकणे अशक्य असल्यानेच फुटीमुळे बारामतीसह राष्ट्रवादीच्या सर्व लोकसभेच्या जागा धोक्यात आल्याचे प्राबचे चंद्रकांत भुजबळ यांनी म्हटले आहे.








