ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. नागरिकांना धमकावणे, परिसरातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, गाडय़ांच्या काचा फोडणे असे प्रकार सुरू आहेत. यासंदर्भात खा. सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे पोलिसांना कोयता गँगला आवर घालता आलेला नाही. आजही या गँगने वारजे परिसरात धुमाकूळ घालत गाडय़ांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे गरजेचे असून, संघटीत गुन्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.