पुणे / प्रतिनिधी :
राज्यात जे काही होते ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच होते, असे काही जण म्हणतात. त्यामुळे राज्यात सत्ता कोणाची आहे, ते कळत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेल्या 100 चांगल्या गोष्टी मात्र त्यांना दिसणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर आहेत. या वेळी जांभूळवाडी तलाव व कात्रज तलावाची त्यांनी पहाणी केली. त्यांनी पुणे महापालिका आणि इरिगेशन खाते यांची तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. महापालिका निवडणुका लवकर घ्यायला हव्या, यावरही त्यांनी आपले मत मांडले.
100 मुद्दे चांगले दिसतील
सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस काल म्हणाले, पवारांमुळे टीआरपी वाढतो. त्यांचे हे वक्तव्य कौतुकाने केलेले होते. याचा अर्थ मी टोला घेत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कॉम्पिमेंट दिली आहे. तसेच ‘लोक माझे सांगाती’ हे पूर्ण पुस्तक वाचले, तर 100 मुद्दे उद्धव ठाकरें बद्दलचे चांगले दिसतील.








