वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वादग्रस्त सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा जामीनाचा अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलींच्या संदर्भात त्यांनी बनावट कागदपत्र तयार करुन लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शनिवारी संध्यकाळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अपील याचिकेवर सुनावणी करण्यात आली. संध्याकाळी साडेसहा वाजता झालेल्या या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांच्यावर कठोर ताशेरे ओढले. त्यांनी याचिकेची लवकर सुनावणी करण्याचा आग्रह धरला होता. पण आपले प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठीं योग्य नाही. मंगळवारी यावर विचार करण्यात येईल. आपण गेले 9 महिने जामीनावरच आहात. त्यामुळे आणखी दोन-तीन दिवसांमुळे काही फरक पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची सुटी सोमवारी संपत आहे. त्यामुळे मंगळवारी ही अपील याचिका योग्य प्रक्रियेअंतर्गत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ठेवलाr जाईल. पीठ स्थापन केल्यानंतर सुनावणी केली जाईल, असे सुटीतील पीठाने त्यांना सुनावले. त्यामुळे सेटलवाड यांना त्वरित दिलासा मिळू शकला नाही.
शरण येण्याचा आदेश
सेटलवाड सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना त्वरित पोलिसांच्या आधीन होण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या अंतरिम जामीनाचा कालावधी येत्या काही दिवसांमध्ये संपत आहे. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आदेशाला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. तथापि, ती मागणी सध्यातरी फेटाळण्यात आल्याचे दिसून येत आहे.









