► वृत्तसंस्था / चेन्नई
भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घेऊ द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने तशी अनुमती त्यांना दिली होती.
ईडीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. बालाजी यांच्यावर उपचार झाल्यानंतर ईडी पुन्हा त्यांची कोठडी घेऊ शकते आणि नंतर त्यांची चौकशीही केली जाऊ शकते. त्यांची चौकशी करण्याचा ईडीला पूर्ण अधिकार असून तो अधिकार उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाधित झालेला नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीतल्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.









