केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खुनाचा प्रयत्न प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता लोकसभा खासदार हा दर्जा त्यांना पुन्हा बहाल होऊ शकतो. गेल्या आठवड्यातच संसद सचिवालयाने आदेश जारी करत फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते.
खूनप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांच्यावरील शिक्षा कायम ठेवल्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. 11 जानेवारीपासून फैजल यांची खासदारकी रद्द केल्याचे मानले जाणार होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयाने फैजल यांना शिक्षा सुनावली होती. आता पुन्हा उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची खासदारकी अंतिम निकालापर्यंत कायम राहू शकते. केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे फैजल यांच्या खासदार पदावर टांगती तलवार आली होती.
मोहम्मद फैजल या खासदारावर खुनाचा गंभीर आरोप होता. नुकतीच पुनर्सुनावणीमध्येही त्यांची शिक्षा कायम राहिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने एक बुलेटिन जारी करत त्यांची खासदारकी रद्द केली. केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालाचा आधार घेत लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे. 11 जानेवारी 2023 रोजी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्या दिवसापासूनच फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात येत आहे, असे लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिनमध्ये म्हटले होते.









